Sunday, October 13, 2019

अजगर Indian Rock Python (python molerus molerus)


अजगर Indian Rock Python (python molerus molerus)

आपणास सर्वश्रुत असलेले पिलांना जन्म देणारे अनाकोंडा हे पानअजगर मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्याच प्रमाणे अजगर हा संपूर्ण भारतात आढळणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. अजगराला ‘इंडियन रॉक पायाथोन’ म्हणून ओळखले जाते. खडकाळ जमिनी व घनदाट वनात झाडावर वावरतात. भारतात आढळणारा पायथॉन रेटिक्युलेटस हा अजगर १० मीटर पर्यंत लांब व घेर २५ सेंमी. असतो. अजगराचा रंग पाठीवर मातकट फिक्कट असतो. व त्यावर गडद तपकिरी रंगांचे पट्टे व ठिपके असतात. त्वचा गुळगुळीत असून त्यावर चमकदार खवले असतात. उभ्या बाहुल्या असलेले डोळे पिवळे असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ घटलेल्या हाडांचे पाय दिसून येतात. त्याला नखेसुद्धा स्पष्टपणे पहावयास मिळतात. 
अंधारात भक्ष पकडण्यात तरबेज असतो. त्याच्या वरच्या ओठांच्या खाचामध्ये उष्णतेला संवेदनशील भाग असतो. त्यामुळे हवेत गारवा असला तरी उष्ण रक्ताचे उंदरासारखे प्राणी चपळाईने पकडतो भक्ष्याच्या शरीराभोवती वेटोळे घालून घट्ट आवळतो. त्यामुळे भक्षाला हालचाल करणे मुश्कील होते व भक्ष गुदमरून मरते. अजगरच्या जबड्याला अस्तीबंधानी जोडलेली लवचिक हाडे असतात. त्यामुळे त्याच्या शरीराच्या आकारमानापेक्षा मोठे भक्ष तो गिळकृत करू शकतो. भक्ष गिळण्याची त्याची विशिष्ट पद्धत असून आपले भक्ष डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. त्यामुळे भक्षाचे पाय किंवा शिंगे यांचा त्याला गिळताना अडसर होत नाही. अजगराची पचनशक्ती प्रचंड असते त्यामुळे त्याच्या पोटात भक्ष्याची हाडे सहजपणे पचवली जातात. त्याच्या विष्ठेत खालेल्या प्राण्याचे केस, शिंगे अथवा पंख न पचता दिसून येतात. एखाद्या मोठ्या जनावराला भक्ष्य केल्यानंतर अजगराला श महिन्यापर्यंत अन्नाची गरज भासत नाही.
अजगराचा विणीचा हंगाम जानेवारी ते मार्च असतो. मिलनानंतर मादी साधारणता तीन महिन्यांनी १० ते १०० पर्यंत अंडी घालते. अजगराची मादी अंड्यातून पिले बाहेर येई पर्यंत अंड्यासोबत राहून त्यांचे रक्षण करते व आवशकते नुसार आपल्या शरीराचे आकुंचन व प्रसरण करून अंडी उबवण्याचे काम करते.
जगभरात सापांची मोठ्या प्रमाणावर शिकार व तस्करी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात सापाच्या कातड्याला खूप मागणी असते. सापाच्या कातडीपासून पट्टे, पर्स व शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. त्यामुळेच अजगराची शिकार व तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते. भारतात वन्यजीव कायद्याअंतर्गत जागर पाळणे किंवा सापांची कातडी बाळगणे बंदी करण्यात आली आहे. असे करणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा व दंड आकारण्यात येतो.

Sunday, September 29, 2019

धामण Rat snake (Ptyas mucosus)


धामण Rat snake (Ptyas mucosus)


हा एक बिनविषारी साप असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस (Ptyas mucosus) असे आहे. धामण हा साप भारतभर आढळतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी १,००  मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर सापडतो.
नाग सापसारखा दिसणारा हा साप भीती उत्पन्न करणारा साप आहे. याची लांबी २.०० ते २.५० मी. किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असून घेर सु. १० ते १२  सेंमी. असतो. शेपूट टोकदार असते. डोके लांबट असून बारीक मानेपासून स्पष्टपणे वेगळे असते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळया असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा सोनेरी असतो. नाकपुड्या मोठ्या असतात. पाठीचा रंग हिरवट किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीराच्या पुढील भागावरील खवले एकाच रंगाचे असतात; पण मागच्या बाजूला पुष्कळ खवल्यांच्या कडा काळ्या असतात. यामुळे पाठीवर जाळे असल्यासारखे दिसते. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पिवळसर असते आणि गळ्याजवळ पिवळा रंग जास्त स्पष्ट असतो.
धामण सर्व प्रकारच्या परिस्थितींत सातत्याने आढळणारा साप आहे. घरांच्या जवळपास तो दिसतो.  मनुष्यवस्तीत दिवसा तो एखाद्या सुरक्षित जागी लपून बसतो; पण वस्ती नसलेल्या ठिकाणी तो निर्भयपणे दिवसा हिंडत असतो. जुन्या पडीक भिंती,  झाडेझुडपे, कुजणारा पालापाचोळा, भातशेते वगैरे ठिकाणी तो असतो. धामणसाप  उत्तम पोहणारा असून झाडावर चढण्यात तो निपुण असतो. जलाशयाच्या जवळ वावरताना दिसतो. तो बेडूक खातो. त्याचप्रमाणे झाडावर चढून पक्षी आणि त्यांची अंडी खातो. घुशी आणि उंदीर हे त्याचे नेहमीचे खाद्य आहे.
धामण अत्यंत चपळ असतो. त्याला पकडण्याचा अथवा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यास तो शत्रूवर हल्ला करण्यास मागेपुढे पहात नाही. तो कडकडून चावाही घेतो. परंतु असे असले तरी तो मुळीच विषारी नाही हे लक्षात असले पाहिजे.
या सापाविषयी अनेक गैरसमज प्रचलित आहेत. हा साप गाई-म्हैशीचे दुध पितो. जनावरांच्या पायांना तिढा घालतो. आपले शेपूट जनावरांच्या नाकात खुपसून ते वेगाने बाहेर काढून त्यांना मारून टाकतो. अश्या अनेक चुकीच्या समजुती आहेत.
या सापाचा विणीचा हंगाम पावसाळ्यात असतो. हा अंडी घालणारा साप एका मादी एका खेपेला १२ ते २० अंडी घालते. साधारणतः  २ महिन्यांनी अंडी फोडून पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले जन्माच्या वेळी १० ते १२ इंच लांब असतात.
भारतात पट्टेरी धामण (टायास फॅसिओलेटस) व वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती प्रामुख्याने आढळतात.

सापांचे चमत्कारी विश्व


सापांचे चमत्कारी विश्व

साप म्हटले कि अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय रहात नाही. साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सापांचे हे सरपटणारे जीव असून त्यांना कुठल्याहीप्रकारचे हात अथवा पाय नसतात.  सापांना हात व पाय नसल्याने ते जमीनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्द्ल बद्दल माणसाला नेहमीच कुतूहल आणि भीती वाटते. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष आणि अनेक गैरसमज. साप चावाल्यानतर मृत्य अटळ असतो अशी दृढ भावना माणसाच्या मनामध्ये खोलवर रुजली आहे. माणसासाठी सापांचे विश्व हे अत्यंत गूढ आहे. अनेक चमत्कार व गैरसमज सापाशी जोडले गेले आहेत.  सापांविषयी अचूक ज्ञान नसणे हे अनेक गैरसमजापैकी एक कारण आहे. खऱ्या अर्थाने साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. कारण पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करणारे उंदीर हे सापांचे प्रमुख अन्न आहे. असे म्हणतात की, पाच एकर क्षेत्रात एखादा साप वावरत असेल तर त्या क्षेत्रात एक हि उंदीर शिल्लक रहात नाही. परंतु प्रत्येक साप विषारी असतो असा समज असल्यामुळे नाहक भीती बाळगली जाते.  सर्वच साप विषारी नसतात. त्यातील काही सापांमुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच संशयास्पद वाटतो. दरवर्षी हजारो माणसे सर्पदंशाने मरतात. असे असले तरी सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. भारतात नाग, घोणस, फुरसे व मन्यार या चार प्रमुख जाती विषारी साप म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी आपण विषारी व बिन-विषारी सापांची माहिती जाणून घेणार आहोत.